हृदयद्रावक : ९ वर्षांच्या मुलीचा शाळेत हार्ट अटॅकने मृत्यू; ४ महिन्यांपूर्वी भावाने गमावला जीव

Foto
जयपूर : राजस्थानमधून एक काळजात चर्र करणारी घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेत सकाळी प्रार्थनेदरम्यान पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी दिव्या अचानक बेशुद्ध पडली आणि अवघ्या काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासात हार्ट अटॅक हे मृत्यूचं कारण असल्याचं सांगितलं आहे. गोटन उपखंडातील टालनपूर येथील रहिवासी राजेंद्र यांची ९ वर्षांची मुलगी दिव्या एका खासगी शाळेत पाचवीत शिकत होती. नेहमीप्रमाणे ती सकाळी ७ वाजता शाळेत पोहोचली होती. शाळेत प्रार्थना सुरू असतानाच दिव्या अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, दिव्या रांगेत उभी होती आणि अचानक ती मागच्या बाजूला पडली. शाळा व्यवस्थापनाने तातडीने तिला उचललं आणि गावातील शासकीय रुग्णालयात नेलं. मात्र तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केलं. डॉक्टरांच्या मते, प्राथमिक तपासात हार्ट अटॅक हेच मृत्यूचं संभाव्य कारण मानलं जात आहे. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला, त्यानंतर मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात आला.

या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव हादरलं आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वीच दिव्याचा मोठा भाऊ अभिषेक (१६ वर्षे) याचाही असाच अचानक मृत्यू झाला होता. लागोपाठ दोन मुलांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.